Ad will apear here
Next
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग तीन


नमस्कार, आजपासून आपण मुख्य विवेचनास सुरुवात करू या. एका भागात एक किंवा दोन ऋचांचा समावेश करून, त्यावर विवेचन देऊन आपण श्रीसूक्त विवेचन पूर्ण करू या, असा माझा मानस आहे. शेवटच्या भागात मी पूर्ण श्रीसूक्त देईन. प्रत्येक ऋचेचा अर्थ जर आपणास नीट समजला, तरच श्रीसूक्त पठणास अर्थ आहे. ऋचेचा अर्थ नीट समजून तो लक्षात ठेवावा असं मला वाटतं, जेणेकरून तुम्हाला श्रीसूक्त पठणाच्या वेळी तो अर्थ समजून उमजून त्या अर्थाशी एकरूपता साधणं शक्य होईल.

।। अथ श्रीसूक्त प्रारंभ: ।।
।। श्रीगणेशाय नम:।।
।। हरि ॐ।।

।।हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ।।१।।

अर्थ : हे अग्निदेव, जिचा रंग सोन्यासारखा तेजस्वी, लखलखीत असून, जिने सुवर्ण आणि चांदीचे तेजस्वी हार परिधान केलेले आहेत अशा, चंद्राप्रमाणे प्रसन्नमुद्रेच्या आणि सुवर्णमय कांती असलेल्या श्रीलक्ष्मीचे माझ्यासाठी आवाहन करा (तिला माझ्याकडे येण्याचे आवाहन करा)

अर्थविस्तार :
या पहिल्या ऋचेत श्रीमहालक्ष्मीच्या सुरेख रूपाचे वर्णन केलेले आहे असे आपल्या निदर्शनास येईल. श्रीसूक्त हे वेदोक्त सूक्त असून, त्याला स्तुतिमय स्तोत्राचे रूप जास्त आहे, असं गुरुदेव म्हणतात. या पहिल्या ऋचेत वर्णन केलेल्या सर्व गोष्टी या अतिशय सुंदर, सौंदर्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि तेजमय आहेत. श्री ही जी देवता आपण इथे श्रीसूक्तात गृहीत धरतो आहोत, ती महालक्ष्मीचं एक अतिशय मोहक आणि सुरेख रूप आहे. या पहिल्या ऋचेचा नीट अभ्यासविचार केल्यावर आपल्या लक्षात येतं, की श्रीसूक्त हे अग्निदेवाला केलेलं आवाहन असून, त्या आवाहनातून, विनंतीतून नंतर देवी महालक्ष्मीची (श्रीरूप) स्तुती केलेली आहे. श्रीसूक्त ही मी एक अतिशय रम्य अशी मागणी (Demand) आहे, असं समजतो. आईकडे एखादं मूल ज्या मनमोकळेपणाने आणि जितक्या अकृत्रिम, अनौपचारिक पद्धतीने एखादी गोष्ट मागते तितक्याच मनमोकळेपणाने तिची स्तुती करून मागणी करणं इथे अपेक्षित आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मी हे ऐश्वर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले गेले आहे. अनेक जण म्हणतात, की ज्या घरात, कुटुंबात अनाचार चालतो, अनैतिक धंदेव्यवसाय चालतात, ज्या घरात कलह असतो अशा घरांतही पैसा भरपूर आहे असं दिसतं. मग असं का? तुम्ही नेहमीच लक्ष्मी उपासनेच्या वेळी मद्यपान वर्ज्य, जुगार आणि परस्त्री/पुरुषगमन वर्ज्य आहे असं सांगता. असं का? याचं उत्तर मी इतकंच देईन, की तुम्हाला त्या अशा घरातला ‘पैसा’ दिसतो. पैसा म्हणजे सुखाची साधने खरेदी करण्याचे साधन. पैसा अशा घरात दिसतो हे सत्य आहे; पण त्या घरात आनंद असतो का? त्या घरात सुसंस्कृतपणा दिसतो का? घरातील माणसं समाधानी असतात का? आरोग्यसंपन्नता तिथे असते का? मन:शांती, धैर्य आणि सौख्य नांदते का? भय, क्लेश, मन:स्ताप तिथे असतो का? या अनेक प्रश्नांची उत्तरे अशा वेळी शोधावी लागतात. मी मागेच सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त पैसा नको आहे. अनेक गोष्टी त्यासोबत हव्या आहेत. सुखाची साधने खरेदी करून त्यांचा उपभोग घेता यावा म्हणून पैसा अतिशय महत्त्वाचा आहे; पण तो आपलं साध्य नाही, ते केवळ साधन आहे. मागे उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या घरात, कुटुंबात आणि वैयक्तिक आयुष्यात मन:शांतीयुक्त सौख्य, धैर्य, अजातशत्रुत्व, आनंद, सुख, कौटुंबिक सौख्य, उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, सुरक्षितता, सुसंस्कृतपणा आणि ज्ञान या सगळ्याचा समुच्चय असणारी श्रीलक्ष्मी आपल्याला हवी आहे. पुढील ऋचांमध्ये आपण अधिक सविस्तरपणे याचा ऊहापोह करणार आहोत.

(क्रमश:) 

- सचिन मधुकर परांजपे, 
पालघर

(श्रीसूक्त लेखमालेचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(श्रीसूक्त लेखमालेचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XYQFCO
Similar Posts
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सहा लेखमालेच्या सहाव्या भागात आज आपण ऋचा क्रमांक सहा व सात यांचा अभ्यास करणार आहोत. मी मागेच सांगितल्याप्रमाणे श्रीसूक्त हे ऋग्वेदातील एक अतिशय प्रभावी सूक्त असून ते स्तुतिपर आहे. श्रीसूक्ताची प्रत्येक ऋचा ही मंत्रमय आहे असं म्हटलं, तरी ती अतिशयोक्ती होणार नाही हे सत्य आहे.
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग एक विघ्नहर्ता श्रीगणेश, कुलदैवत श्री लक्ष्मीनारायण/महाकाली आणि सद्गुरूंच्या कृपेने श्रीसूक्त लेखमालेचा आरंभ करतो आहे. श्रीसूक्तावर विवेचन करणं हे माझ्यासारख्या अल्पमती, अल्पबुद्धी आणि सर्वसामान्य व्यावसायिक लेखकाच्या दृष्टीने शिवधनुष्य उचलण्यापेक्षाही दिव्य काम आहे याची पूर्ण जाणीव ठेवून, शक्य तितकं स्वत:च्या
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग चार आजच्या लेखात आपण श्रीसूक्तामधील ऋचा क्रमांक दोन आणि तीनचा विचार करणार आहोत. या दोन्ही ऋचा श्रीसूक्तामधील अतिशय महत्त्वाच्या ऋचा मानल्या जातात. श्रीलक्ष्मीच्या अतिशय प्रभावी अशा स्तोत्रांपैकी श्रीसूक्त हे प्रमुख असल्याने ते तर्कशुद्ध, सुस्पष्ट आहे. त्या सूक्तामधील प्रार्थनेचं तंत्रही असंच मोकळं आणि मनस्वी आहे, हे आपल्या लक्षात येईल
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग पाच लेखमालेच्या पाचव्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक चार आणि पाच अभ्यासणार आहोत. श्रीसूक्त जसंजसं पुढे सरकत जातं, तसंतसं ते अधिकाधिक परिपक्व आणि स्तुती या अर्थाने परिपूर्ण होत जातं, असं आपल्या ध्यानात येईल. अगोदर आपण ऋचा आणि अर्थ बघून घेऊ या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language